Wednesday 1 July 2020

आबांची डायरी


सध्या थोडी परीस्थीती सुधारली आहे पण, कोरोना अजूनही संपुष्टात आलेला नाही. आपल्याला आपली काळजी घ्यावी लागणार आहे. पण पैसा हा कमवावाच लागणार, त्यासाठी घराबाहेर पडावंच लागणार, त्यासाठी स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यावी लागणार. खरं सांगायचं तर, आपण मध्यमवर्गीय खऱ्या अर्थाने पिचले जातो. खुप श्रीमंत यांना दोन वेळेच्या जेवणाची चिंता नसते. खुप गरीब लोकांसाठी सरकार विविध योजना घेऊन त्यांच्यासमोर जातात. मरतो तो middle class वालाच. त्याला कुणीच वाली नसतो, सगळेच सुग्रीव!!!!! टिपरे यांच्यातच मोडतात म्हणू त्यांची सुख दु:ख ही आपल्यासारखीच असतात!!!

आबांची डायरी
२१ जून २०२०
६०च्या पुढच्या म्हाताऱ्यांची या कोरोनाने फारच गोची केलीय. घराबाहेर पडायलाच मिळत नाही. खिडकीतूनच सुर्य चंद्र पाहायचे! कंटाळा आलाय
अशा आयुष्याचा! सगळे म्हणतात की, जोवर या कोरोनावर लस किंवा औषध येत नाही तोवर हे असच राहाणार. डोळे मिटायच्या आधी तरी डोळ्यासमोर ते औषध दिसावं हीच आशा. तशात काल नेने म्हणाले, आबा आपल्या आशा पल्लवीत होणाची चाहूल लागलीय. या नेनेंचं पावसाळा आला की काय होतं कळत नाही. पावसाळ्यात छत्र्या उघडतात तसे हे नेने पावसाळ्यात काव्यमय शब्दांच्या ताडपत्र्या टाकतात! नीट सांगा हो नेने.. जरा डाफरलोच. तर म्हणाले, दाढी वाल्या बाबाने औषध काढलय. मी चक्रावलोच. कोण? तो “योगा योगाने” झालेला धंदेवाला??? नेने म्हणाले हो... कोरोनिल असं नाव त्या औषधाचं!!!! अरे देवा, ट्रंपला जे जमलं नाही ते या बाबाने करून दाखवलं. ते उगीचच टेस्ट वगैरे करण्याच्या भानगडीत पडतात. बाबाचं बघा. नो टेस्ट डायरेक्ट ट्वेंटी ट्वेंटी(२०२०) भगव्या कपड्यातला हा बाबा एक दिवस समस्त टाटा गोदरेज आंबानी अडाणीला... त्याच्या कंपनीत पॅकिंगला बसवणार. स्वातंत्र्य मिळालं देशाला पण सुर्योदय मात्र ठराविक लोकांच्या खिडकीतच झाला. बाबा नेमका एवढा पैसा जमवून ठेवत कुठे असेल? त्याच्या कपड्यांना खिसाही दिसत नाही.

शेखरची frustration मधे लिहीलेली डायरी
२२ जून २०२०
तीन महिन्यांचा वचपा सरकार एकत्रच काढणार का काय? विज बील आलय घरी. आकडा
बघूनच आकडी आली. तीप्पट बील पाठवलय. बरं त्या “अदानी” कडे तक्रार करायची सोय नाही. काॅलसेंटर मधून कुठल्यातरी “अडाणी” बोलणार. त्याला काही मागचं पुढचं माहीती नसणार. मी तीन वेळा याची तक्रार केली. फायदा काहीच नाही. उत्तर आलं तेव्हा असं सांगितलं की, तीन महीने आमचा माणूस physically मीटर चेक करायला आला नाही. म्हणून त्या दिवसात अंदाजे बील पाठवलं. या महिन्यापासून सगळं सुरळीत सुरू केलय. त्यामुळे मागील ३ महिन्यांचा difference सुध्दा या महिन्यात जोडलाय. ही लोकं सांगतील ते आपण मान्य करायचं. बील भरलं नाही तर विज कापणार. कधी कधी वाटतं, नेमकं जन्माला येऊनच चुकलो की काय? डिझेल पेट्रोल भाववाढ. महागाई गगनाला भिडलीय. पण प्रत्येक राजकारणी त्यांच्या त्यांच्यात गुंतलेला. त्याला फिकीर फक्त युती आघाडी टिकवायची. केंद्र आणि राज्यसरकारच्या गेम मधे नागरीकांचा गेम होतोय. आबा नेहमी स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी सांगतात. त्यावेळी लढायचं कोणासोबत हे तरी माहीती होतं. आत्ता सगळेच आपले म्हणून मिरवणारे.... कृष्णही नाही सोबतीला.
शिऱ्या म्हणाला की २०११ साली महागाईवर समस्त विरोधीपक्ष, लोकप्रिय अभिनेते तावातावाने tweet करायचे. आजकाल कोणी ब्र काढायला तयार नाही. त्या खिलाडीकुमारने गाडी विकली की आपली देशभक्ती तेच कळत नाही. विरोधातले सगळे विरूध्द बाजूला आल्याने त्यांना विचारायची सोय नाही. मुग गिळून गप्प बसणे.. याचं स्पष्टीकरण देण्यासाठी मध्यमवर्गीय असं लिहावं.

शलाका डायरी
२२ जून २०२०
आज सकाळी बाबांनी विचारलं.. आजच्या
दिवसाचं महत्त्व माहीती आहे का? म्हटलं हो.. आज मी ३ महिन्यांनी पिंकीला भेटणार. साॅलीड वैतागले माझ्यावर. म्हणाले २२ जून आज!!! चाफेकर बंधूंनी पराक्रम केला होता. रॅंडचा वध केला. देशाच्या स्वातंत्र लढ्यातील महत्वाचा टप्पा!! इतकं बोलले सगळं डोक्यावरून गेलं. चाफेकर बंधूंविषयी शाळेत वाचल्याचं आठवलं. पण आता याक्षणी त्याचा काय फायदा? मला कधी कधी कळत नाही, बाबा अचानक overreact का करतात? आबा आणि बाबांमधे हाच फरक आहे. आबा माहीती देतात.. बाबा माहीती कोंबतात. आईला सांगितलं मी की, जरा बाबांचं महिन्याचं चेकिंग करून घ्यायला हवं. अचानक वयस्कर झाल्यासारखे वागतात. आई चिडली माझ्यावर. बरोबर आहे म्हणा. मी बाबांना वयस्कर म्हटल्याचं तीला आवडणार नाही. तीच्यासाठी ते तीच्या नवऱ्याला म्हटल्यासारखं झालं ना! आबा मात्र माझ्या मताला correct म्हणाले. त्यांनाही जाणवतय की त्यांचा मुलगा त्यांच्यापेक्षा वयस्कर झाल्यासारखा वागतो. Comedy आहे सगळं. पण नंतर एक article वाचल्यावर लक्षात आलं की, यात बाबांची चूक नाही. वातावरणच असं झालय की, त्या ageची माणसं ही म्हाताऱ्यासारखी वागू लागलीत. Political social atmosphere त्याला कारणीभूत आहे. लगेच मी स्वत:ला बजावलं की, आपण असं वागायचं नाही. वय कितीही झालं तरी कमीच सांगायचं. म्हणजे म्हातारं होण्याचा प्रश्नच नाही.

शिऱ्याची डायरी
२३ जून २०२०
येत्या २५ जूनला आपण विश्वचषक मिळवून ३७ वर्ष होतील. कपिल देव अगदी देवा सारखा पावला. त्यावेळी आपण तो कप जिंकला नसता तर, कायम आपण बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान याच ग्रुपमधे राहीलो असतो. दरारा निर्माण झालाच नसता. आणि मुख्य म्हणजे पुढच्या क्रिकेटर्सनी आयुष्यात पैसा कमावला नसता. अन्न वस्त्र निवारा या गरजांसोबतच क्रिकेट देशाची गरज झालीच नसती. किती आपलं नुकसान झालं असतं? जगाने तेंडुलकर नावाचा देव, याची देही याची डोळा पाहीलाच नसता. सगळ्यात महत्वाचं.. देश माझ्यासारख्या फॅनला मुकला असता. कोणी त्यांच्या मॅचेस रिपीट पाहील्या असत्या???
कोरोना मधे हे सगळे क्रिकेटर काय करत असतील? IPL ची practice घरच्याघरी सुरू असेल कदाचित. कारण एकवेळ कोरोनाच्या लागणीवर उपाय निघेल, पण क्रिकेटची लागण या देशाला जी लागलीय त्याचा इलाज शक्यच नाही.

शामला डायरी
२४ जून २०२०
३ महिने सांभाळलं पण, आज अखेर जे घडू नये ते घडलंच! कोरोना संभावीत आमच्याच इमारतीत सापडला. महानगर पालिकेत कर्मचारी आहेत दोंदे. त्यांची टेस्ट positive आली. लगेच बीएमसी वाले आले. इमारतीचा ४था मजला सील केला. त्यांना त्यांच्या घरातच ठेवलं. एका खोलीत. इमारतीत थोडी चलबिचलता निर्माण झाली. पण सगळेच मदतीला धावून आले. खरं सांगायचं तर कोरोना हा मला एखाद्या न बोलवलेल्या पाहूण्यासारखा वाटू लागलाय. आमचे दूरचे गोपी काका असेच. त्यांना कधी कोणी आपणहून घरी बोलवणार नाही. हे मात्र हजर!!! पाहूणचार ४ दिवसांचा ठिकआहे. हे १५ दिवस मुक्काम ठोकणार. त्यात नको नको ते गैरसमज घरामधे माणसांमधे निर्माण करणार. १५ दिवस घर अस्थीर. तसच या कोरोनाचही आहेच की!!! गोपी काका येऊ नयेत म्हणून आम्ही आपली काळजी घेऊ लागलोय. त्यांच्या गावातले एकजण आबांना फार मानतात. गोपी काकांनी बॅग भरली की त्यांच्या येण्याच्या वेळेचा अंदाज घेऊन आम्ही २ दिवस बाहेर जातो. ते येऊन कुलूप पाहातात आणि त्रागा करत घरी परततात. त्यांच्या येण्याची खबरदारी आम्ही घेतो. तीच प्रत्येकाने या कोरोनाची घ्यायची. किती सोपं आहे?
उध्दवसाहेब बरेच दिवस tv वर live आले नाहीत. चुकल्यासारखं होतय. भावाचा फोन लागत नाही कोकणात वादळामुळे. त्यात हे live येत नाहीत. ते live न येण्याला कोणतं वादळ कारणीभूत असावं? इटालियन की बारामतीच??

केदार शिंदे
२६ जून २०२०

No comments:

Post a Comment

आबांची डायरी

सध्या थोडी परीस्थीती सुधारली आहे पण, कोरोना अजूनही संपुष्टात आलेला नाही. आपल्याला आपली काळजी घ्यावी लागणार आहे. पण पैसा हा कमवावाच लागणा...